सोलापूर –अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि गुन्हे शाखेने संयुक्त रित्या धाड टाकून जुळे सोलापुरातील सी.बी.सी. बिल्डींग मध्ये चालणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले . कारवाईदरम्यान तीन ते चार महिला घटनास्थळावरून पसार झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी स्पा सेंटर चालकास अटक केली असून याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय बापू कांबळे (वय २७, रा. पत्रा तालीम, उत्तर कसबा, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या स्पा सेंटर चालकाचे नाव आहे. त्याने
आसरा पुला खालील सी.बी.सी. बिल्डींगमधील २०७ आणि २०८ हे दोन दुकान गाळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भाड्याने घेऊन हा अवैध व्यवसाय सुरू केला होता.
“फ्लोरा फॅमिली स्पा सेंटर’ च्या नावाखाली बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि गुन्हे शाखेला मिळाली होती . त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेतर यांनी दोन ते तीन दिवस सखोल पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारी बनावट (बोगस) गिऱ्हाईक पाठवून खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाने छापा टाकला. या कारवाईत स्पा सेंटरचा चालक अजय कांबळे याला अटक करण्यात आली . आरोपी हा महिलांकडून मसाजच्या बहाण्याने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या महिला ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अलका शहापुरे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ सह भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३(२) आणि १४४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील वर्षभरात शहरात तीन कारवाई करीत १० महिलांची सुटका केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेतर, सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिवे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अलका शहापुरे व पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख यांनी पार पाडली आहे.
Post Views: 4