सोलापूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्र आणि ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, संगमेश्वर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर महाविद्यालयात एनसीसी स्वयंसेवकांसाठी क्षयरोग जनजागृती प्रशिक्षण घेण्यात आले.
शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद कुमार यांनी क्षयरोगाची कारणे, संसर्गाचा प्रसार, तपासणीचे महत्त्व, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. स्वयंसेवकांनी सार्वजनिक ठिकाणी रॅली, पोस्टर प्रदर्शन व पथनाट्याद्वारे जनजागृती करावी, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून टीबीमुक्तीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले.‘टीबी मुक्त भारत’ ॲपचा वापर, निक्षय मित्र, निक्षय पोषण योजना तसेच रुग्णांसाठी प्रथिनेयुक्त आहाराचे महत्त्व याबाबतही माहिती देण्यात आली.क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार असून, क्षयमुक्त समाज निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार व आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, लेफ्टनंट कर्नल कमांडिंग ऑफिसर शरभ बाबर, कॅप्टन शिल्पा लंबा, लेफ्टनंट तुकाराम साळुंखे, निरज लांडगे, विनायक दळवी, राजू नारायणकर यांच्यासह एनटीईपी कर्मचारी व एनसीसी स्वयंसेवक उपस्थित होते. ‘टीबीमुक्त सोलापूर’ची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 11