सोलापूर : राष्ट्रीय रेबीज दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी रेबीज प्रतिबंधाबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रेबीज हा प्राणघातक आजार असला तरी प्राण्याच्या चाव्यानंतर वेळेत प्रतिबंधात्मक उपचार घेतल्यास त्यापासून बचाव शक्य असल्याची जनजागृती जागृती करण्यात येणार आहे.
कुत्रा, मांजर किंवा संशयित प्राण्याने चावा घेतल्यास जखम साबण व वाहत्या पाण्याने किमान १५ मिनिटे धुवावी. जखमेवर मिरची, हळद, चुना, तेल किंवा अन्य घरगुती पदार्थ लावू नयेत. नागरिकांनी तातडीने जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा मदर तेरेसा पॉलीक्लिनिक, डफरिन चौक येथे वैद्यकीय सल्ला घ्यावा. येथे प्रतिरेबीज लस उपलब्ध आहे.
भटक्या कुत्र्यांना चिडवणे, दगड मारणे किंवा त्यांच्या घोळक्याजवळून वेगाने जाणे टाळावे. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
कुत्र्यांचा उपद्रव किंवा आपत्कालीन परिस्थितीत मनपाच्या चॅटबॉट क्रमांक ९११२२२१९०१ वर तक्रार करता येईल. “चावा लहान असो वा मोठा, उपचारात विलंब करू नका,” असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
—-
Post Views: 4