सोलापूर : निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि देशातील घटनात्मक संस्थांबाबत विरोधकांकडून सातत्याने संशय निर्माण केला जात असून, हे राजकारण केवळ ‘फेक नॅरेटिव्ह’च्या आधारावर सुरू असल्याचा आरोप करत राहुल गांधींसह विरोधकांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी जनतेत जाऊन २४ तास काम करावे आणि निवडणुका लढवाव्यात, असे आव्हान शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. आयोगातील तिन्ही आयुक्तांनी संयुक्तपणे निर्णय एकमताने घेतल्याचे स्पष्ट केले असतानाही त्यावर संशय निर्माण केला जात आहे. निवडणूक आयोग ही संविधानाने निर्माण केलेली स्वायत्त घटनात्मक संस्था असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरही नमूद आहे.
राहुल गांधी यांनी ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि इतर घटनात्मक संस्थांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरावे. ज्या ठिकाणी विरोधकांचा पराभव होतो तेथे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे आणि सत्ता मिळालेल्या ठिकाणी त्याच प्रक्रियेवर आक्षेप न घेणे, ही भूमिका जनतेला मान्य होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंकडून मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चावरही वाघमारे यांनी टीका केली. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचा आरोप करणाऱ्यांनी त्याचा पुरावा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. घटनात्मक संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचे राजकारण अराजकाला आमंत्रण देणारे ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
महाविकास आघाडीत वरून दोस्ती आणि आतून कुस्ती असल्याचा दावा करत त्यांनी संजय राऊत, आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. काँग्रेसने स्वतंत्र भूमिका घेण्याऐवजी ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केल्याचा संदर्भ देत वाघमारे यांनी आघाडीतील मतभेदांवर प्रश्न उपस्थित केले.
दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळाच्या कक्षेत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी संकटाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन वाघमारे यांनी केले. वीज बिल व कर्जवसुलीबाबत शेतकऱ्यांना तगादा लावू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याची तरतूद आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर श्रेयवादाचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या अश्रू पुसणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला.
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही केवळ योजना नसून महिला सक्षमीकरणाचे अभियान आहे. ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून ३३९ कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याचे सांगत ही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही वाघमारे यांनी दिली. निधी कोणत्या विभागाकडून उपलब्ध करून द्यायचा, हा सरकारचा तांत्रिक विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे कौतुक
सोलापुरातील डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे त्यांनी कौतुक केले. लेझीम, झांज आणि ढोल-ताशांच्या पारंपरिक गजरात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसह पोलिस व प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन केले. स्वतःच्या परिसरातील जयशंकर तालीम तरुण मंडळाने रात्री १२ वाजता ढोल-ताशे बंद करून केवळ लेझिमच्या माध्यमातून सादरीकरण केल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. सोलापुरातील डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श राज्याने घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
———