पंढरपूर – ओपन लिंक फाउंडेशनच्या वतीने आयोजित आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचणी येथील शिक्षिका अनिता वेदपाठक यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) स्मिता नडीमेटला आणि दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार यांच्या हस्ते अनिता वेदपाठक यांचा गौरव करण्यात आला.
वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी अध्यापन पद्धती यांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे चिंचणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक कार्याला जिल्हास्तरावर नवी ओळख मिळाली आहे.
कार्यक्रमास मुख्याध्यापक अशोक रत्नपारखी, धनाजी देशमुख, वसीम शेख आणि आप्पाराव राजले यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
अनिता वेदपाठक यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी रोहन कांबळे, विस्ताराधिकारी शारदा रासकर, मोहनराव अनपट तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.
चिंचणी शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची जिल्हास्तरावर झालेली दखल ही शाळेसह परिसरासाठी अभिमानाची बाब असून, या पुरस्कारामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
Post Views: 5