सांगोला – राजेवाडी तलाव आणि निरा उजवा कालव्याच्या काही वितरकांना अद्याप पाणी सोडण्यात आलेले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आ.डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पाणी सोडण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी नीरा उजवा कालवा व राजेवाडी तलाव फलटणचे कार्यकारी अभियंता मोरे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र धोत्रे, तसेच पंढरपूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी ज्या वितरकांना अजूनही पाणी सोडण्यात आलेले नाही, त्यांना तातडीने आणि वेळेत पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
तसेच पाण्याचे समन्यायी वाटप, अनधिकृत उपसा रोखणे आणि दुरुस्तीच्या कामांमुळे होणारा विलंब टाळणे यावरही चर्चा करण्यात आली. काही वितरकांमधून पाणी अद्याप सोडले नसल्याने उन्हाळी पिकांना पाण्याची टंचाई भासत होती. यामुळे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.
राजेवाडी तलाव आणि निरा उजवा कालव्याच्या टेल एंड भागातील शेतकऱ्यांना नेहमीच पाणी मिळण्यात अडचणी येतात. या बैठकीत अधिकाऱ्यांनी लवकर पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळेल. ज्या ठिकाणी कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम चालू आहे ते वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून पाण्याची गळती आणि अपव्यय टाळता येईल.
– आ.डॅा.बाबासाहेब देशमुख




















