सोलापूर : होटगी रोड परिसरातील भाग्यश्री पार्क येथून जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी अखेर यशस्वी ठरली असून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नाला अतिक्रमणमुक्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या परिसरातील नैसर्गिक नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता. परिणामी परिसरात पाणी साचणे, वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. या प्रश्नाकडे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून महानगरपालिकेचे लक्ष वेधले होते.

महानगरपालिका प्रशासनाने याची दखल घेत कारवाई करत नाल्यावरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा केला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचे विशेष आभार मानले. नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासन आणि विजयकुमार हत्तुरे यांच्या प्रयत्नांचे स्वागत करत भविष्यात अशा अतिक्रमणांवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.






















