पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील शेगावदुमाला परिसरात कथित अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाच्या वाहनावर काही जणांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शासकीय वाहनाचे नुकसान झाले असून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबत ग्राममहसुल अधिकारी दिगंबर आबासाहेब डोईफोडे यांनी येथील तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या वाळु घाटांचे लिलाव बंद असल्याने बाजारात वाळूचा तुटवडा निर्माण झाला असून वाळूच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भीमा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी कथित अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जात असली, तरी अशा प्रकारांना पूर्णतः आळा बसलेला नसल्याचे चित्र आहे.
महसल विभागाला १ जुलै २०२६ रोजी तालुक्यातील शेगावदुमाला परिसरात रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या नंतर २ जुलै २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास महसूल पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र तेथे पोहोचताच काही लोक शासकीय वाहनांचा पाठलाग करीत आले. त्यांनी शिवीगाळ करीत कोयत्याचा धाक दाखवित पथकाच्या वाहनावर दगडफेक केली. या मध्ये शासकीय वाहनाचे नुकसान झाले.
दरम्यान सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने पथकाला कारवाई न करताच माघारी परतावे लागले. त्यानंतर येथील तहसिलदार सचिन लंगोटे यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातल्या नंतर ग्राममहसुल अधिकारी दिगंबर आबासाहेब डोईफोडे यांनी येथील तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अक्षय अजिनाथ आटकळे, महादेव वैजिनाथ आटकळे, गोपाळ आटकळे, सचिन काटे, दिपक रामदास चव्हाण, मनोज आटकळे, बालाजी गाडेकर, बालाजी डिकरे, धनाजी सिध्देश्वर आटकळे,वैभव पंढरीनाथ आटकळे, सोमनाथ दशरथ आटकळे, स्वप्नील कुमार कोरे, तुषार अनंता चव्हाण ( सर्व जण रा.शेगावदुमाला, ता.पंढरपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर अवैध वाळू उपशाविरोधातील कारवाईसाठी महसूल पथकाला पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही व्यक्त होत आहे.
Post Views: 10