सांगोला – सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सोलापूर जिल्हा नदी संवर्धन समूहच्यावतीने जिल्हाधिकारी कार्तिकेयन तसेच जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांना भेटून जिल्ह्यातील नद्यांची झालेली दुरावस्था व त्यावरील विविध विभागाच्यावतीने अपेक्षित उपाय यावर नद्यांच्या वेदना मांडल्या. याप्रसंगी शिवाजीराव पवार, अनिल पेठकर, वैजिनाथ घोंगडे, दत्ता पाटील, हनुमंत कादे, प्रवीण तळे, इसाक शेख, श्रीनिवास गंगणे, संजय पोळ, गणेश जाधव, सिद्धांत बाबरे उपस्थित होते. यावेळी नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी तसेच जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दहा जलदूत व त्यावर एक जलप्रेमी असे १२० हून अधिक कार्यकर्ते सामाजिक कार्याच्या माध्यमातून स्थानिक नद्या, पाणी, पर्यावरण यावर काम करत आहेत. परंतु दिवसेंदिवस नद्यांची अवस्था अधिक बिकट होत चालली आहे. जिल्ह्यातील सर्वच लहान मोठ्या नद्या अखेरच्या घटका मोजता आहेत. यावर वेळीच लक्ष नाही दिले तर जीव-जंतू पासून मनुष्य, प्राण्यांच्या जगण्याची व्यवस्थाच बिघडून जाईल. तसेच महसूल विभागाच्यावतीने नद्या ओढ्यातील अतिक्रमणे काढली, नदीपात्र स्वच्छ ठेवले आणि अवैध वाळू उपशावर प्रतिबंधनात्मक उपाययोजना केली तर प्रत्येक नदी ८० टक्के पुनर्जीवित होईल असे मत नदी संवर्धन समूहाचे प्रतिनिधी वैजिनाथ घोंगडे यांनी मांडले. याबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी नदी विकासाबाबत लक्ष घालण्याचे मान्य केले. नदीकाठच्या ग्रामपंचायती मार्फत गावच्या हद्दीतील नदीपात्र दरवर्षी स्वच्छ करण्यात यावे यासाठी ग्रामपंचायतींना आदेश द्यावेत. त्याकरिता वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या निधीतून नदीकाठच्या गावच्या नदी स्वच्छतेसाठी ठराविक निधी राखीव ठेवावा अशी मागणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्याकडे करण्यात आली.























