सोलापूर – शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रोत्सवास आज पासून सुरुवात झाली असून आज सकाळी श्रीरामलिंग चौडेश्वरी मंदिरासमोरील भव्य सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडला तदनंतर सायंकाळी ५ वाजता श्री ललिता सहस्त्रनाम कुमकुम अर्चना चे आयोजन करण्यात आले होते.
या ललिता सहस्त्रनाम कुमकुम अर्चना कार्यक्रमात हजारो महिलांनी नसरापूर प्रकरणातील चिमुकलीस न्याय द्यावा असे साकडे श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चनाच्या माध्यमातून घातले. “मुली वाचवा स्त्रीचा सन्मान करा अत्याचार थांबवा” असे प्रबोधनात्मक संदेश लिहिलेले टी-शर्ट स्वयंसेवकांनी परिधान केले होते व ते लक्षवेधी ठरत होते.
श्री रामलिंग चौडेश्वरी मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे यांनी महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार हे चिंताजनक बाब असून यावर सरकारने दोशी आरोपींवर तात्काळ कारवाई करावी यासाठी श्री चौडेश्वरी मातेसमोर श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चनाने हजारो महिलांनी साकडे घातले असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा सोलापुरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमर म्हेत्रे यांनी केले आहे.


























