बार्शी – महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार, आपल्या प्रलंबित न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून राज्यभरात आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आज (१४ मे २०२६) हाताला काळ्या फिती बांधून शासनाचा तीव्र निषेध नोंदवला.
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
सातवा वेतन आयोग- १०, २० आणि ३० वर्षांनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करणे आणि सातव्या वेतन आयोगाची पूर्ण अंमलबजावणी करणे.
जुनी पेन्शन योजना- २००५ पूर्वी प्रक्रिया पूर्ण होऊनही त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे.
पदभरती- रिक्त असलेली शिक्षकेत्तर पदे तात्काळ भरण्यास मंजुरी देणे आणि पदोन्नतीचे प्रमाण ५०:५० ऐवजी ८०:२० करणे.
इतर मागण्या- प्रयोगशाळा सहायक व परिचर यांचे रजा रोखीकरण, थकबाकी असलेले DCPS/NPS वर्गणी कपात पुन्हा सुरु करणे आणि निवृत्ती वेतन प्रकरणे निकाली काढणे.
बार्शी येथील आंदोलनात जिल्हा सचिव भीमराव मस्के आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरद मस्के यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री शिवाजी महाविद्यालयाचे कर्मचारी हनुमंत घावटे, शहाजी महाडिक, सचिन मोरे, दिनेश स्वामी, मोहन जाधव, आनंद देशमुख, शिवाजी हाके, उत्तरेश्वर राऊत, विक्रांत काकडे, गणेश फपाळ, सुनिता शिंदे, कैलास चव्हाण यांच्यासह बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते.
संयुक्त कृती समितीच्या निर्णयानुसार हे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र केले जाणार आहे. काळ्या फिती लावून कामावर हजर राहणे, त्यानंतर निषेध सभा आणि गरज पडल्यास ‘कामबंद’ आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


























