सांगोला – पंढरपूर शहरात निर्माण झालेला कचरा दूर करून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यासाठी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाच्या सांगोला महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आषाढी वारीपश्चात विशेष स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.सदाशिव देवकर, डॉ.रेणुकाचार्य खानापुरे, प्रा.एस.ए.शहा यांच्या समवेत ३४ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या सूचनेनुसार सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने या उपक्रमाची अंमलबजावणी केली. स्वयंसेवकांनी सांगोला नाका, संत पेठ, महात्मा फुले पुतळा परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, चौफाळा आणि शिवाजी चौक या परिसरात साचलेला प्लास्टिक कचरा, निर्माल्य तसेच इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ केला. यावेळी नागरिक आणि भाविकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या सेवाभावी कार्याचे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच भाविकांनी मनापासून स्वागत करून कौतुक केले.
चौकट-
स्वच्छता ही केवळ एक मोहीम नसून ती प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी आहे. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग हा परिवर्तनाचा प्रभावी मार्ग आहे.
-साहेबराव ढेकळे, संस्था सहसचिव