बार्शी – बार्शीकरांच्या प्रवासाच्या सोयीसाठी बार्शी बस आगारात दाखल झालेल्या ५ नवीन एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला.
आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले की, बार्शी हे व्यापारी, शैक्षणिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि नागरिक एसटीने प्रवास करतात. गेल्या अनेक महिन्यांपासून बसेस कमी पडत असल्याच्या तक्रारी होत्या. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळेत फेऱ्या कमी पडत होत्या. ही बाब त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आज आपल्याला ५ नवीन बसेस मिळाल्या आहेत आणि उर्वरित नवीन १५ बस लवकरात लवकर बार्शी आगारात दाखल होतील..
या २० नवीन बसेस दाखल झाल्यानंतर बार्शी ते सोलापूर, पुणे, मुंबई, तुळजापूर, पंढरपूर या प्रमुख मार्गांवर जास्तीत जास्त फेऱ्या सुरु होतील आणि प्रवाशांना वेळेवर सेवा मिळेल, असा विश्वास आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला.नवीन बसेस या अत्याधुनिक आणि प्रवाशांच्या सोयीच्या आहेत. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होईल. विशेषतः विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी या बसेस उपयुक्त ठरतील..
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.तेजस्विनीताई कथले, पंचायत समितीच्या सभापती सौ.मिनाक्षीताई रोंगे, उपसभापती संतोषदादा निंबाळकर, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, पंचायत समिती सदस्य किरण घुले, प्रशांत कथले, दिपक रोंगे, श्रीमंत थोरात, रामेश्वर पाटील उपस्थित होते.