सोलापूर – स्व-संरक्षणासाठी शारीरिक ताकदीसोबतच चेहऱ्यावर आत्मविश्वास, मनात धैर्य आणि प्रसंगवधान असणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येक मुलीने स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संगीता हती यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स यांच्या क्रीडा विभागातर्फे रुद्रशक्ती गुरुकुल व युगंधर आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त महिलांसाठी मोफत स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संगीता हती यांनी स्व-संरक्षण प्रशिक्षणासंदर्भातील आपले अनुभव कथन केले. संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुलींना स्व-संरक्षणाचे तंत्र अवगत असल्यास प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे चेअरमन राजशेखर शिवदारे म्हणाले की, “मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आमच्या संस्थेच्या दृष्टीने स्व-संरक्षणासह विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे (अण्णा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व लोकहितवादी उपक्रमांची व्यापक मालिका राबविण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून मुलींसाठी स्व-संरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.”
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजवलन व प्रतिमापूजन करण्यात आले. प्रा. डॉ. एम. बी. पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी प्रमुख पाहुण्या संगीता हती यांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सिद्धेश्वर वाले, नरेंद्र गंभीर, सुभास गुणाळे, प्राचार्य कलशेट्टी, प्राचार्य कापसे, प्राचार्य वाजपेयी, अंजली तिवारी, प्रशासनिक अधिकारी डॉ. डी. एस. सूत्रावे तसेच प्र. प्राचार्य डॉ. ए. बी. वळसंग्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. प्र. प्राचार्य डॉ. अनमोल वळसंगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एम. बी. कांबळे यांनी केले.
——-
प्रशिक्षण शिबिराची वैशिष्ट्ये:
रुद्रशक्ती गुरुकुल मुख्य प्रशिक्षक: विवेक मिस्कीन
प्रशिक्षिका: साक्षी कालगुडे, सोमाक्षी माडे, श्रद्धा सरपदे, अदिती नल्ला, गौरी माळी, जानवी म्हेत्रे
कालावधी: १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत.
























