पंढरपूर – शहरातील भादुले चौक परिसरातील सात ते आठ दुकानांना बुधवारी (ता.१७) मध्यरात्री अचानक भीषण आग लागून ती दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत चप्पल व किराणा साहित्य विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आगीचे कारण शॉर्टसर्किट असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी रात्री उशिरा दुकानदानदार मंडळी नेहमीप्रमाणे आपली दुकाने बंद करून घरी गेले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास एका दुकानातून अचानक धूर व आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही क्षणांतच आगीने शेजारील दुकानांनाही विळखा घातला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आग आणखी पसरून मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आगीमुळे आणखी नुकसान होऊ नये म्हणून परिसरातील वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. स्थानिक नागरिकांनीही अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, ऐन आषाढी वारीच्या तोंडावर छोट्या व्यावसायिकांची दुकाने आगीत भस्मसात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
———————-
फोटोओळी : पंढरपूर: शहरातील मध्यवर्ती असलेल्या भादुले चौकातील सुमारे सहा ते सात दुकानांना बुधवारी मध्यरात्री भिषण आग लागली. या आगी मध्ये भक्ष्यस्थानी पडलेल्या दुकानांमधील सर्व माल तसेच सामान जळुन खाक झाला त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.
Post Views: 9