मुदखेड – तालुक्यातील मेंडका येथील कु. श्रेया संजय सुदेवाड हिने ‘खेलो इंडिया’ गेम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत ४×१०० मीटर रिले स्पर्धेत कास्यपदक पटकावले आहे. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर येथे सुरू असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
श्रेयाच्या या यशामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह मेंडका गावाचा मान उंचावला आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने हे यश संपादन केले असून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना पदके केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या गौरवाच्या क्षणी श्रेयाच्या यशाचा सर्वांनी मनापासून गौरव केला.
श्रेयाच्या या यशाबद्दल मेंडका येथील प्रशांत निखाते व ग्रामस्थ, नातेवाईक, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच विविध क्षेत्रातील शासकीय अधिकारी मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून भविष्यातही ती असेच यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी कु. श्रेया सुदेवाड हिचे मार्गदर्शक सचिन शिंदे सर व कोच परमेश्वर इंजेपवाड यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.



















