
सोलापूर – ‘आपटे चषक’ क्रिकेट स्पर्धेत ‘साऊथ सोलापूर आपटे ग्रुप ब्ल्यू’ने विहान क्रिकेट अकॅडमीवर ५० धावानी मात करीत विजयी सलामी दिली.
साऊथ सोलापूर आपटे ग्रुपच्या वतीने सोलापूरच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एका अनोख्या ‘संमिश्र वयोगट’ (अंडर-१४, १६ आणि १९) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन दयानंद क्रिकेट मैदानावर सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन टूर्नामेंट कमिटीचे चेअरमन संजय वडजे, रणजीपटू प्रवीण देशेट्टी आणि सुनील चव्हाण यांच्या प्रामुख उपस्थितीत झाले.
सलामीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना साऊथ सोलापूर आपटे ग्रुप ब्ल्यू संघाने निर्धारित षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात २०३ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये तन्मय वाघमोडे याने ५६ धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली, तर जय गुंड याने ३० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. विहान अकॅडमीकडून राजवीरने ३, तर धनराज जाधव आणि प्रवीण आयवळे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
२०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विहान क्रिकेट अकॅडमीचा संघ अवघ्या १५३ धावांत गारद झाला. साऊथ सोलापूर आपटे ब्ल्यू संघाच्या अचूक गोलंदाजीमुळे हा सामना त्यांनी ५० धावांनी खिशात घातला. आपटे ब्ल्यू संघाकडून अनिश मुळे याने भेदक मारा करत ४ बळी घेतले, तर जय गुंड याने २ बळी मिळवून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या अनिश मुळे याला सामन्याचा मानकरी म्हणून गौरवण्यात आले.


















