
सोलापूर – ‘विजय चषक’ क्रिकेट स्पर्धेत साऊथ सोलापूर रेड संघाने राजमाता सांगोला संघावर ४८ धावांनी मात करत शानदार विजय आपल्या नावावर केला.
येथील इंदिरा गांधी गांधी पार्क स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात साऊथ सोलापूर रेड संघाचा सलामीवीर प्रथमेश देगावकर याने मैदानावर उतरताच चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ३६ चेंडूंत ६४ धावांची वेगवान खेळी केली आणि संघाला मजबूत सुरुवात करून दिली. त्याला दुसऱ्या बाजूने सिद्धांत कांबळे याने ५९ चेंडूंत ५१ धावा करत उत्तम साथ दिली. त्यानंतर चेतन माढेकरने २९ चेंडूंत २८ धावांचे (४ चौकार आणि १ षटकार) महत्त्वपूर्ण योगदान दिले. या त्रिकुटाच्या जोरावर साऊथ सोलापूर रेड संघाने ३०.५ षटकांत सर्वबाद १९५ धावांचा आव्हानात्मक पल्ला गाठला.
१९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजमाता सांगोला संघाची सुरुवात खराब झाली. मात्र, त्यांचा प्रमुख फलंदाज सत्यजीत गवळी याने एक बाजू लावून धरत १०३ चेंडूंत ६९ धावांची झुंजार आणि संयमी खेळी केली. दुर्दैवाने, त्याला दुसऱ्या बाजूने इतर कोणत्याही फलंदाजाची खंबीर साथ मिळू शकली नाही. साऊथ सोलापूर रेड संघाच्या धारदार गोलंदाजीसमोर सांगोला संघाचा डाव ३५.५ षटकांत ९ बाद १४७ धावांवरच मर्यादित राहिला आणि त्यांना ४८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
साऊथ सोलापूर रेड संघाच्या या विजयात चेतन माढेकर ‘विजयाचा शिल्पकार’ ठरला. फलंदाजीत २८ धावांचे योगदान दिल्यानंतर, त्याने गोलंदाजीतही आपली जादू दाखवली. चेतनने ७ षटकांत १ निर्धाव षटक टाकत अवघ्या २५ धावांच्या मोबदल्यात सांगोला संघाचे ३ महत्त्वाचे बळी टिपले. त्याच्या या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
















