सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळ व चित्रस्पर्श कलाविहार यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ला बगीचा येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला असून एकूण ३०० स्पर्धकांनी आपली कलाकृती सादर केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या जीवनातील एक प्रसंग हा स्पर्धेचा विषय होता. स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटांत घेण्यात आली. विविध शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपस्थित होते, तर अनेक पालकही आपल्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आले होते.या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून, महापुरुषांच्या विचारांची जाण वाढवण्यास हातभार लागत असल्याचे चित्र दिसून आले.
विशेष म्हणजे, ख्यातनाम चित्रकार डॉ. सचिन खरात यांचे नाव ऐकून पुण्याहून एक पालक आपल्या मुलींना घेऊन खास स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते.
महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार समजून घेण्याची प्रेरणा मिळते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून अभ्यास करण्याचे आवाहन केले.
यावेळी डॉ. सचिन खरात यांनी थेट चित्रकला सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या लाईव्ह डेमोमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. “मी कोणाचा ? मी सर्वांचा… ही संकल्पना घेऊन त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे चित्र साकारले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाधिकारी मल्हारी माने, महिला व बालकल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे यांची उपस्थिती लाभली. तसेच पर्यवेक्षक सुरेश कासार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
























