पंढरपूर – ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेताना अनंत अडचणी आल्या. त्यातूनही त्यांनी उच्चशिक्षण घेवून समाजासाठी सर्वस्व अर्पिले. त्यांचे कार्य, त्याग आणि योगदान यांचे महत्व पाहता आज त्यांची जयंती जवळपास १३५ देशात साजरी केली जाते. तुम्ही असे कार्य करा की जगाला तुमच्या कार्याचा हेवा वाटेल. यासाठी जीवनाला सकारात्मकतेने पाहणे आवश्यक आहे.डॉ.आंबेडकर यांनी समाजाला शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा अतिशय मोलाचा मंत्र दिला.’असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ प्रा.आर.वाय.पाटील यांनी केले.
स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सुळंबी (ता.राधानगरी, जि.कोल्हापूर) मधील आर.वाय. पाटील जनजागृती प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक व वक्ते प्रा. आर.वाय पाटील हे मार्गदर्शन करत होते. प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्तविक केले.
बोलताना पाहुणे प्रा.आर.वाय.पाटील म्हणाले की, ‘केवळ महापुरुषांच्या जयंत्या साजरा न करता त्यांच्या विचारांचे स्मरण देखील करणे गरजेचे आहे.’ असे आवाहन करून त्यांनी महाड सत्याग्रह, मान सरोवर, चवदार तळे, मनुस्मृती दहन, दलित मंदिर प्रवेश, हिंदू कोर्ट बील आंदोलन, भाक्रा-नांगल प्रकल्प, नदी जोड कालवा, जलप्रकल्प यावर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी स्वेरीच्या इंजिनिअरिंग व फार्मसीमधील विविध स्पर्धा, प्रोजेक्ट आणि विविध कलाकौशल्य, क्रीडा, इ. विभागात यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डॉ. नीता तळवलकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन केले. यावेळी अभियंता व शिवाजीराव रानमळे, साहेबराव भुसे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, डॉ.नीता तळवलकर, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव डॉ.सुरज रोंगे यांनी आभार मानले.

















