सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील लेख एक्झिम (टॉवेल कारखाना) येथे शनिवारी वेस्टेज कापसाला आग लागल्याची घटना घडली. महापालिका अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लेख एक्झिमचे मालक इंदरमल जैन यांचा कारखाना ई-९८, अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे असून, बॉयलरजवळील वेस्टेज कापसाला अचानक आग लागली. बॉयलरमधून उडालेल्या ठिणगीमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट रोड एमआयडीसी अग्निशमन केंद्राची एक गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझविण्याची मोहीम हाती घेत अल्पावधीत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. त्यामुळे आग कारखान्याच्या इतर भागात पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी केंद्र अधिकारी गौतम आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली फायरमन निलेश पवार, विकास नागरगोजे आणि वाहनचालक समर्थ बंडे यांनी ही बचाव कार्यवाही यशस्वीपणे पार पाडली, अशी माहिती अग्निशामक दलाचे उपअधीक्षक अच्युतराव दुधाळ यांनी दिली.
घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ वाघमारे उपस्थित होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती देण्यात आली.
Post Views: 37