सोलापूर : नूतनीकृत एन्. एम्. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरात आरोग्यसेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. डी-मार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन रविवारी दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. तसेच एलआयसी गोल्डन ज्युबिली फाउंडेशनच्या सहकार्याने जर्मनीतून कार्ल झाईस कंपनीचा अत्याधुनिक ऑपरेटिंग मायक्रोस्कोपही उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या ऑपरेशन थिएटरच्या संकुलाचे उद्घाटन डि मार्टचे संचालक एन भास्करन यांच्या हस्ते रविवारी करण्यात येणार आहे. नूतनीकृत एन्. एम्. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरात आरोग्यसेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला असून ७४ खाटांचा आंतररुग्ण विभाग, ३० खाटांचे आयसीयू, डायलिसिस सेंटर, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि विविध विशेष विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत.हॉस्पिटलमध्ये सध्या तीन मजल्यांवर आंतररुग्ण विभाग कार्यरत असून ३० खाटांचे आयसीयू, १२ वातानुकूलित खोल्या, सहा स्पेशल रूम, प्रसूती विभाग, १९ खाटांचा वॉर्ड आणि कॅज्युअल्टी विभाग सुरू करण्यात आला आहे. शहरातील ६७ तज्ज्ञ डॉक्टर येथे सेवा देत असून आधुनिक एक्स-रे, सोनोग्राफी, व्हेंटिलेटर, मेडिकल गॅस पाइपलाइन आणि आठ खाटांचे अद्ययावत डायलिसिस सेंटरही उपलब्ध आहे.
समाजाच्या सहकार्यामुळे वाजवी दरात दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचे उद्दिष्ट आहे. मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी कॅथलॅब, अत्याधुनिक कार्डिओलॉजी विभाग, नवजात शिशु आयसीयू, नर्सिंग कॉलेज आणि कर्करोग निदान विभाग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली. विविध दानशूर संस्था व व्यक्तींच्या सहकार्यामुळे हॉस्पिटलचा विस्तार शक्य झाल्याचेही
अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस उद्योजक राम रेड्डी, डॉ. शिरीष कुमठेकर, डॉ. सुनील मेहता, डॉ. संदीप भागवत, डॉ. राजेंद्र घुली, डॉ. विजय सावस्कर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोडल, वासुदेव बंग, संजयभाई पटेल, कल्पेश झवेरी, राजेश गांधी, राजन रिसबुड, सविता लळीत, रामदासी, जाम मिलचे राजेश दमाणी तसेच हॉस्पिटलचे सेवाव्रती व कर्मचारी उपस्थित होते.
एन्. एम्. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमधील सुविधा
– ७४ खाटांचा आंतररुग्ण विभाग, ३० बेडचे आयसीयू आणि आधुनिक सुविधा सुरू.
– डी-मार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचे २ ऑगस्ट रोजी उद्घाटन.
– ६७ तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, डायलिसिस सेंटर, व्हेंटिलेटर, एक्स-रे व सोनोग्राफीसह अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध.
– कॅथलॅब, कार्डिओलॉजी, नवजात शिशु आयसीयू, नर्सिंग कॉलेज लवकरच सुरू होणार.
– वाजवी दरात दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प.
Post Views: 27