मोडनिंब – मृदसंधारण व जलसंधारणाच्या माध्यमातून तुळशी (ता. माढा) गावातील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या उद्देशाने आमदार सुभाष देशमुख यांच्या सहकार्यातून ‘शिरपूर पॅटर्न’च्या धर्तीवर नाला सरळीकरणाच्या कामाला मंगळवारी (६ ऑक्टोबर) सुरुवात झाली. लोकमंगल फाउंडेशन, सोलापूर यांच्या सहकार्याने मशिनरी व हायवा उपलब्ध करून देण्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.तुळशीचे ज्येष्ठ नेते पांडुरंग गव्हाणे यांच्या हस्ते मशीनची पूजा करून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामविकासासाठी राजकारण बाजूला ठेवून तरुणांनी पुढे यावे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे उभी करता येतील, असे त्यांनी सांगितले.तुळशीचे सुमारे ६२५० एकर क्षेत्र असून, परिसराचा पाणलोट बशीच्या आकाराचा आहे. या क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता ते अडवून भूगर्भात साठविण्याच्या उद्देशाने नाला सरळीकरण करण्यात येणार आहे. ग्रामसभेच्या निर्णयानुसार सुमारे ७० फूट रुंद, ३० फूट खोल आणि ६५० ते ८०० फूट लांबीच्या स्वरूपात हे काम करण्यात येणार आहे.जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर आणि सोलापूरचे निवृत्त जलसंधारण अभियंता घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू करण्यात आले आहे. राहुल कृष्णात गव्हाणे यांच्या भवानी मंडपाच्या पाठीमागील सुमारे ६५ एकर क्षेत्रात कामाचा प्रारंभ झाला.पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी या कामाचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे.सरपंच डॉ. शरद मोरे, उपसरपंच दत्तात्रय दगडे, कृषितज्ज्ञ मनोज शहा, बापूसाहेब दगडे, प्रमोद वसेकर, पांडुरंग गव्हाणे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, युवक तसेच जाधववाडी येथील मोहन मोरे, सौदागर जाधव, विलास जाधव, कृषिमित्र यशवंत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























