
सांगोला – गतवर्षी सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बहुतांश गावांमध्ये राहत्या घरांवरील पत्रे उडून गेली, घरांच्या भिंती कोसळल्या तसेच अनेक कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ आली होती. या नैसर्गिक आपत्तीनंतर बाधित नागरिकांना शासनाची मदत मिळावी यासाठी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगोला तालुक्यातील ७५ गावांतील ५८२ पात्र लाभार्थ्यांना एकूण २३ लाख १६ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर ही मदत संबंधित बाधित खातेदारांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार बाळुताई भागवत यांनी दिली. सदरचे अनुदान मंजूर केल्याबद्दल आ.डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन यांचे आभार मानले.
चौकट-
बाधित नागरिकांना न्याय मिळावा आणि नुकसानभरपाई लवकर मिळावी यासाठी आ.डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी महसूल विभाग तसेच शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करून विषय मार्गी लावण्याचे काम केले. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून पात्र लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यावर त्यांनी भर दिला होता.
Post Views: 12