धाराशिव : शिर्डी येथे झालेल्या सीबीएसई क्लस्टर-९ आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिवच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेतेपद मिळविले. मुंबई, पुणे, रायगड यांसह विविध जिल्ह्यांतील संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत धाराशिवच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांना कडवे आव्हान दिले.
धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंनी मोठ्या शहरांतील संघांसमोर आत्मविश्वासाने खेळ करत उल्लेखनीय कामगिरी केली. अमेय माडेकर, ऋषभ शेट्टी, अहान मेहता आणि फैजान पठाण यांनी स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळ करत संघाच्या उपविजेतेपदात मोलाचे योगदान दिले.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक विनायक वांजरे यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर खेळाडूंनी स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर ग्रामीण भागातील खेळाडूही मोठ्या शहरांतील संघांना सक्षमपणे आव्हान देऊ शकतात, हे या कामगिरीतून अधोरेखित झाले.
स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल धाराशिवच्या खेळाडूंचा चषक, पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, प्राचार्य, क्रीडा विभाग तसेच क्रीडा शिक्षक विनायक वांजरे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
Post Views: 18