सोलापूर – अध्यक्ष महिला, सर्व पदाधिकारी महिला, इतकेच काय सर्व कार्यकर्त्याही महिलाच! सोलापूरमधील विजापूर रस्त्यावर असलेल्या सहयोग प्रतिष्ठानच्या गणेशोत्सव मंडळात हा प्रागतिक प्रकार गेल्या दहा वर्षांपासून घडतोय. सध्या नवरात्रीनिमित्त महिलांच्या शक्तीची चर्चा होत असताना ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे.
विजापूर रस्त्यावरील विक्रम प्लाझा, नम्रता सोसायटी आणि राणा प्रताप सोसायटी अशा तीन सोसायट्यामधील दीडशे कुटुंबिय सदस्य असलेल्या सहयोग प्रतिष्ठानची ही कौतुकास्पद कथा आहे. साधारण 20 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मंडळाने सुरुवातीची काही वर्षे पुरुष मंडळींच्या कारभारात गणेशोत्सव सुरू केला. काही वर्षातच पुरुष कार्यकर्त्यांचे नोकरी, व्यवसायाचे व्याप वाढल्याने मंडळाचा कारभार चालवणे अवघड होऊ लागले. मात्र महिलांनी पुढाकार घेत आम्ही मंडळ चालवतो अशी भावना व्यक्त केली. पुरुषांनीही त्याला होकार देत 2016 साली सर्व कारभार महिलांकडे सोपवला. गेल्या दहा वर्षापासून महिला या मंडळाचा कारभार पूर्णपणे स्वतंत्र चालवत आहेत. वर्गणी गोळा करणे, मंडपाची उभारणी, मूर्ती निवडणे, मूर्तीची प्रतिष्ठापना आदी सर्व बाबी पुरुषांचा कोणताही सहभाग न घेता महिला पूर्ण करतात. दररोज पूजाही महिलांच्या हस्ते होते. पौरोहित्य करणाऱ्याही महिलाच आहेत. गणेशोत्सवात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आदी सामाजिक उपक्रम, मुला-महिलांसाठी खेळ या सर्व गोष्टींचे आयोजन महिलाच करतात. विसर्जना दिवशी गणपती मंडपातून बाहेर आणणे, विसर्जन मिरवणूक शेवटपर्यंत नेणे, अगदी विसर्जन करण्यापर्यंतही कामं महिलाच करतात. फार किरकोळ पुरुषांचा सहभाग असतो.
महिला कारभारी असल्याने वर्गणी मागताना कोणत्याही प्रकारचे टेन्शन ना महिलांना येते, ना वर्गणी देणाऱ्या सभासदांना येते. सर्व लोक राजी खुशीने आपल्याला जमेल तेवढी वर्गणी देतात. तरीही दरवर्षी वर्गणी जमा होण्याचे प्रमाण वाढतच आहे.
जमलेल्या वर्गणीचे काटेकोर नियोजन करून त्यातच मंडळाचा सर्व कारभार पूर्ण केला जातो. पोलिसांबरोबर असलेल्या बैठकीसाठीही महिला पदाधिकारी जातात. तरुण, मध्यमवयीन महिलांना जेष्ठ महिला मार्गदर्शन करतात. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण न देता सर्व प्रकारे सामाजिक एकोपा जपून आदर्श असा गणेशोत्सव गेल्या दहा वर्षांपासून यशस्वीपणे साजरा करत आहेत. संस्कृती जपण्याचे काम महिलाच करतात असे म्हटले जाते. मात्र त्याची अत्यंत योग्य प्रचिती सहयोग प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या देतात. संपूर्णपणे महिलांकडून चालले जाणारे कदाचित सोलापुरातील हे एकमेव गणेशोत्सव मंडळ आहे.
महिनाभर महिला याच कामात व्यस्त
विशेष म्हणजे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी काही दिवस व नंतर नवरात्रोत्सवापर्यंत सुमारे महिनाभर सर्व महिला गणेशोत्सवाच्या नियोजनात व्यस्त असतात. घरातील कामे पटापट आटपून गणेशोत्सवाचे नियोजन ते त्याचे पूर्ण समायोजन असा महिनाभर सर्व महिला याच कामात व्यस्त असतात. नवरात्रीत बहुतांश महिला उपवास करत असल्याने सोसायटीमधील एका घरी छोट्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
Post Views: 12