पंढरपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात प्रतिटन ५,००० रुपये दर मिळावा, तसेच साखरेची किमान विक्री किंमत (MSP) प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर ८ तास गव्हाण बंद आंदोलन करण्यात आले.
ऊस दर जाहीर न करता गाळप सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेने आक्रमक भूमिका घेत हे आंदोलन केले. ऊस उत्पादनासाठी लागणारी खते, मजुरी, मशागत, बियाणे, औषधे, डिझेल तसेच शेतीसाठी लागणाऱ्या इतर साहित्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५,००० रुपये दर मिळणे आवश्यक असल्याची भूमिका संघटनेने मांडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी साहेब हे साखरेची एमएसपी प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या दरवाढीमुळे साखर कारखान्यांच्या आर्थिक उत्पन्नाला हातभार लागू शकतो. त्यामुळे कारखान्यांनी राजू शेट्टी साहेब यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.
१५ ऑक्टोबर रोजी झालेल्या ८ तासांच्या गव्हाण बंद आंदोलनानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांनी ऊस दराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी तोडगा काढण्यात येईल, असे लेखी पत्र दिले. या लेखी आश्वासनानंतर संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
मात्र, आंदोलन स्थगित केले असले तरी ऊस दराच्या प्रश्नावर संघटनेचे लक्ष कायम राहणार आहे. लेखी आश्वासनानुसार कारखाना व्यवस्थापनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा. केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष दराचा तोडगा काढावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असून, यंदा उसाला प्रतिटन ५,००० रुपये दर मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे.
———–
कोट
राजकारणात युती-आघाडी कोणासोबतही असली, तरी ऊस दराच्या बाबतीत नो कॉम्प्रमाइज..! राजू शेट्टी साहेब मागतील तो दर मिळालाच पाहिजे.
सचिन पाटील
(शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना )
Post Views: 8