सोलापूर : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी काढण्यात आलेल्या तिरंगा वॉकमध्ये सुमारे ५०० विद्यार्थी सहभागी झाले. हातात तिरंगा आणि देशभक्तीपर घोषवाक्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी शहरातून मार्गक्रमण केले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहरातील वातावरण देशभक्तीमय झाले.
सेवासदन प्रशाला, हरीभाई प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला आणि श्रीसिद्धेश्वर प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सकाळी सात ते नऊ या वेळेत विविध मार्गांवरून निघालेले वॉक महापालिका आवारात दाखल झाले. सरस्वती चौक-पार्क चौक, हरीभाई मैदान-जुना एम्प्लॉयमेंट चौक-डफरीन चौक तसेच पासपोर्ट ऑफिस-श्रीसिद्धेश्वर मंदिर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गांचा त्यात समावेश होता.
महापालिका आवारात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी तिरंगा हा देशाची अस्मिता, शौर्य, त्याग आणि एकतेचे प्रतीक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. कामगार व समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा पवार यांनी राष्ट्रप्रेम, संविधानाचा सन्मान आणि सामाजिक जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे गरजेचे असल्याचे नमूद केले. नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, नगरसेविका वाहिदा शेख, नगरसेवक प्रशांत पल्ली, उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह महापालिका अधिकारी-कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
Post Views: 22