पंढरपूर – अक्षरकलेच्या जतनासाठी, संवर्धनासाठी आणि कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले पाचवे राज्यस्तरीय अक्षर संमेलन हे यंदा पंढरपूर येथील स्वेरी काँलेज येथे २२, २३ आणि २४ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्यानंतर फलक लेखन आणि लाईव्ह स्केच प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकार आपल्या कुंचल्यातून आणि अक्षरातून सजीव कलाविष्कार साकारताना पाहणे, ही उपस्थितांसाठी एक वेगळीच अनुभूती ठरणार आहे. त्यानंतर फॅब्रिक कॅलिग्राफी आर्ट्स अंतर्गत कापडी पिशव्या आणि टी-शर्टवरील सुलेखनाचे आकर्षक सादरीकरण महाराष्ट्रातील नामांकित कलाकार करणार आहेत. पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड देत व्यावसायिक संधी निर्माण करण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे. याच दिवशी अक्षर व गालिचा रांगोळीचे प्रात्यक्षिक आणि त्यावरील कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. रंग, अक्षर आणि सौंदर्य यांचा संगम असलेली ही कला अनेकांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी व्यक्तिचित्र रांगोळी अर्थात पोर्ट्रेट रांगोळीचे थक्क करणारे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. यानंतर सुलेखन प्रात्यक्षिक व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. “मी आणि माझे सुलेखन” या उपक्रमांतर्गत कलाकार आपल्या वैयक्तिक कलाप्रवासाचे अनुभव मांडणार आहेत. तसेच ऑनलाईन मार्केटिंग, कॅलिग्राफी सॉफ्टवेअर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कलेमध्ये होणारा वापर यावरही विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे. “कलेचा प्रवास लोकल ते ग्लोबल” या विषयावर आयोजित मुलाखत सत्र कलाकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे.
संमेलनाच्या शेवटच्या दिवशी टायपोग्राफी, फलक लेखन आणि फॉन्ट या विषयांवर विशेष सादरीकरण करण्यात येणार आहे. आजच्या जाहिरात, डिझाईन आणि डिजिटल क्षेत्रामध्ये अक्षररचना व फॉन्ट डिझाईनचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे या विषयांवरील मार्गदर्शन कलाकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार प्रदान करून महाराष्ट्रातील उल्लेखनीय कलाकारांचा गौरव केला जाणार आहे. संमेलनामध्ये सर्वच सहभागी कलाकारांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
संमेलना दरम्यान दोन्ही रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी कलाकारांच्या उपस्थितीत संगीत रजनीचे बहारदार कार्यक्रम रंगणार असून, कला आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळणार आहे. हे अक्षर संमेलन म्हणजे केवळ कार्यक्रम नाही, तर कलाकारांच्या मनांना जोडणारा, कलेचा गौरव करणारा आणि अक्षरांच्या माध्यमातून माणुसकीचा धागा अधिक मजबूत करणारा एक सुंदर सांस्कृतिक उत्सव आहे. “अक्षरांची गोडी, माणसे जोडी” हे ब्रीद खऱ्या अर्थाने साकार करणारे हे संमेलन कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे.
या पाचव्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कॅलिग्राफीची आवड असणारे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे मुख्याधिकारी (गट- अ ) शुभम गायकवाड हे असणार आहेत. स्वागत अध्यक्षपद होप फाउंडेशन महाड येथील नरेंद्र महाडिक भूषविणार आहेत. संमेलनाची सर्व धुरा संयोजक अक्षरमित्र अमित भोरकडे, ज्ञानेश्वर विजागत, एम.एम.पवार व प्रशांत वाघमारे संभाळत आहेत. संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन आवश्यक करण्यात आलेले आहे. संमेलनातील कलाकृती व लेखन साहित्य सर्वांसाठी २४ मे रोजी पाहण्यास खुले राहणार आहे.















