सोलापूर : शेळगी येथील माजी पोलिस पाटील श्री जगदीश मल्लिकार्जुन पाटील यांच्या घराण्याच्या वतीने गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून अखंडपणे साजरा होत असलेला कारहुनवी (बैलपोळा) उत्सव यंदाही पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते केरळ येथून विशेष निमंत्रित करण्यात आलेले चेंडोमिलन वाद्याविष्कार आणि कांतारा नृत्याविष्कार. या दोन्ही कलाप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकत संपूर्ण मिरवणुकीला वेगळीच रंगत आणली.
उत्सवाची सुरुवात सकाळी मानकरी श्री जगदीश मल्लिकार्जुन पाटील यांच्या वाड्यासमोर गाय आणि बैलांच्या विधिवत पूजनाने झाली. नैवेद्य अर्पण केल्यानंतर परंपरेनुसार मानाच्या सहा बैलजोड्यांना पाटील वाड्यासमोर भाशिंग बांधण्यात आले. त्यानंतर शेळगी गावठाणातून बैलजोड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीदरम्यान केरळच्या पारंपरिक ढोलवादनाचा आविष्कार असलेल्या चेंडोमिलन वाद्यपथकाने दमदार तालांवर वातावरण भारावून टाकले. त्याचबरोबर लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा कांतारा नृत्याविष्कार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ढोलांच्या गजरात आणि नृत्याच्या आकर्षक सादरीकरणामुळे संपूर्ण मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मिरवणुकीच्या मार्गावर शेळगी परिसरातील सुवासिनींनी बैलजोड्या तसेच मानकरी श्री जगदीश पाटील यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. गावातील प्रमुख मार्गांवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. मिरवणूक गावच्या वेशीवर पोहोचल्यानंतर परंपरेनुसार मानाचा कर तोडण्यात आला आणि कारहुनवी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या सोहळ्यास श्री सिद्धेश्वर जत्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, नंदीफणाचे मानकरी सोमनाथ मेंगाने, मल्लिकार्जुन देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष श्री जगदीश मल्लिकार्जुन पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश पाटील, नगरसेवक अविनाश पाटील, केदार पाटील, विश्वजीत नंदीमठ, शिवानंद मेंडके, दिलीप पाटील, राजशेखर पाटील, रेवणसिद्ध यलशेट्टी, सिद्धाराम धप्पाधुळे, नागनाथ बाळशेट्टी, चंद्रकांत रमणशेट्टी, कल्याणी बोरगावकर, अनिल यलशेट्टी, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह शेळगी परिसरातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीडशे वर्षांची परंपरा जपत आधुनिक सांस्कृतिक सादरीकरणाची जोड दिल्याने यंदाचा कारहुनवी उत्सव विशेष आकर्षणाचा ठरला.
Post Views: 6