
सोलापूर : दक्षिण तालुक्यातील मंद्रूप ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला आहे. रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक मेहमूद सुभेदार यांच्या त्रासाला कंटाळून आरोग्य विभागातील कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. शिवाय सहा नर्सची पदे असताना केवळ दोनच नर्सवर काम सुरू असल्याने कामाचा ताण वाढला आहे. कनिष्ठ लिपिक स्वता गैरहजर असूनही कर्मचार्यांना त्रास देत असल्यामुळे बदली करून घेणार्या कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील दैनंदिन कामे ठप्प झाली असून त्याचा फटका गरीब रुग्णांना बसत आहे.
लिपिक सुभेदार हे वेतन, रजिस्टर, बिले, रजा, आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये वारंवार अडथळे आणतात. किरकोळ कारणांवरून वाद घालणे, फायली अडवून ठेवणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सहकार्य न करणे असे प्रकार ते करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून आरोग्य कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी रुग्णालयात येण्यास टाळाटाळ करत आहेत.
त्यामुळे ओपीडी, लसीकरण, माता-बाल संगोपन आणि औषध वितरणसारख्या महत्वाच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत.
सर्व कर्मचाऱ्यांनी यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक व उप संचालक यांच्याकडे लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. आता वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयालाही याबत माहिती देण्यात आली असून प्रशासकीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मंद्रूपसारख्या ग्रामीण भागातील रुग्णालयात त्वरित मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन रुग्णसेवा पूर्ववत करावी. तसेच कर्मचार्यांना त्रास देणार्या कनिष्ठ लिपिकावर कारवाइ करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
—
चौकट
….
आमदार देशमुख यांनी लक्ष देण्याची मागणी
….
मंद्रूप ग्रामीण रूग्णालयात विविध सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुभाष देशमुख प्रयत्न करीत आहेत. मात्र ग्रामीण रूग्णालयात कनिष्ठ लिपिकाच्या त्रासामुळे आरोग्य व्यवस्थेवर परीणाम होत असल्याने कर्मचारी वैतागले आहेत. एक डाॅक्टर व चार नर्स पदे रिक्त असल्याने आमदारांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

















