सोलापूर – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक प्रारूप मतदार यादी २१ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असून अंतिम मतदार यादी १४ ऑक्टोबर २०२६ ला प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, पुणे विभाग दिग्विजय आहेर यांनी अधिसूचना जारी केली आहे.
कोल्हापूर खंडपीठाने २४ जुलै २०२६ रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर २०२६-२०३१ या पाच वर्षांच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी ४ जुलै २०२६ ही अर्हता दिनांक धरण्यात आली असून दि. १३ ऑगस्ट २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रतिनिधींचे ठराव मागविण्यात आले होते. दाखल झालेले एकूण २ हजार १६५ ठराव सहनिबंधकांकडे प्रारूप मतदार यादीसाठी पाठविण्यात आले होते. त्या प्राप्त ठरावानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या प्रसिद्धीनंतर आक्षेप नोंदवताना संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी, ई-मेल आयडीसह लेखी स्वरूपात पुराव्यासह अर्ज करावा लागणार आहे. ३० सप्टेंबरनंतर आलेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
चौकट
पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम
मतदार यादी प्रसिद्ध करणे-२१ सप्टेंबर २०२६
मतदार यादीवर आक्षेप व हरकती स्वीकारणे- २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर
आक्षेप / हरकतीवर निर्णय देण्याचा अंतिम दिनांक- ९ ऑक्टोबर
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे- १४ ऑक्टोबर
चौकट
या ठिकाणी प्रारूप यादी कुठे पाहता येईल?
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, पुणे यांचे कार्यालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे
मुख्य कार्यालय – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सोलापूर
जिल्हा उपनिबंधक, सोलापूर कार्यालय
सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका निवडणूक अधिकारी कार्यालये
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर




















