वैराग – एकता महिला मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गौरी-गणपती आरास स्पर्धा २०२६’ चा भव्य बक्षीस वितरण सोहळा आणि महिला प्रेरणादायी मार्गदर्शन मेळावा अत्यंत भक्तिमय, चैतन्यमय आणि उत्साही वातावरणात मोठ्या थाटामाटात पार पडला. ‘गावसाने होलसेल साडीज’, गांधी चौक, वैराग येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचा शुभारंभ श्री गणेशाच्या भावपूर्ण आरतीने झाला. त्यानंतर एकता महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा स्नेहपूर्वक सत्कार व सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत एकूण १५० महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या कल्पकतेचे व सुप्त कलागुणांचे प्रदर्शन केले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ढाल, पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ: प्रभाकर क्षीरसागर
मनोगत व्यक्त करताना एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर म्हणाले, “प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही विशेष कौशल्य व गुणवत्ता असते, मात्र त्याला व्यक्त होण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज असते. महिलांच्या याच सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्यातील कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे हाच एकता महिला मंचचा मुख्य उद्देश आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जात असून, भविष्यातही महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.”
स्पर्धेचे निकाल आणि सन्मानित विजेते:
गणपती व गौरी आरास स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे जाहीर करून त्यांना सन्मानित करण्यात आले:
* प्रथम क्रमांक: जयश्री संकपाळ
* द्वितीय क्रमांक: दीप्ती गायकवाड
* तृतीय क्रमांक: राजनंदनी हाके
* उत्तेजनार्थ व विशेष पारितोषिके: सरिता कुलकर्णी, स्नेहल तळेकर, वर्षा साळुंखे, रंजना गवळी, मैना सोनवणे, लक्ष्मी सुतार, जयश्री संकपाळ, रंजनी घोंगडे, राणी गवळी, पंचशीला बनसोडे, सुवर्णा साळुंखे, राजश्री बादगुडे, अनुजा काजळे, वैशाली साळुंखे, गीतांजली जोशी, सोनाली गायकवाड, अमृता वाघमारे, रेणुका चौगुले, लक्ष्मी मोरे, मंगल डाके, संगीता डाके, आणि उषा भांगे.सुरेखा कोळी, उषा ठाकूर, संगीता काजळे
याशिवाय सोहळ्यात आयोजित विविध उप-स्पर्धांमधील विजेत्यांनाही बक्षीसे देण्यात आली तसेच सहभागी सर्व १५० महिलांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख मान्यवर व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:
या प्रसंगी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री आमदार सुभाष (बापू) देशमुख, डॉ. शीतल बोराडे, युवा उद्योजक नानासाहेब वरदाने, ‘गावसाने होलसेल साडीज’चे संचालक रोहित गावसाने, माधुरी वरदाने, धनराज गरड, संतनाथ हॉटेलचे मंथन सावंत, अभिनव सेल्सचे प्रकाश कासार आणि एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता महिला मंचच्या सोलापूर जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार, जिल्हा प्रवक्त्या रंजना गवळी, गीतांजली जोशी, रत्नप्रभा गायकवाड, उषा ठाकूर, संगीता काजळे, सुरेखा कोळी यांच्यासह महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून महिला सक्षमीकरणाची ध्येयधोरणे आणि संघटित कार्याची भूमिका मांडली.
विशेष प्रतिक्रिया कॉलम “महिलांच्या सक्षमीकरणातूनच समृद्ध समाजाची निर्मिती” “घर-कुटुंब सांभाळून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. आपल्या आवडीनुसार छोट्या व्यवसायातून सुरुवात करून हळूहळू त्याचा विस्तार करावा. बचत गट, घरगुती उद्योग, स्थानिक उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण कराव्यात. महिला उद्योजकतेला योग्य मार्गदर्शन, बाजारपेठ आणि आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. एक महिला सक्षम झाली की संपूर्ण कुटुंब समृद्ध होते आणि समाज प्रगत होतो; म्हणूनच महिलांच्या कष्टाला आणि कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज आहे.” — मा. श्री. सुभाष (बापू) देशमुख (माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार)
Post Views: 14