बार्शी – जालना येथून सोलर पंपांचे साहित्य घेऊन बार्शी तालुक्यातील खांडवी येथे आलेल्या एका चालकाच्या टेम्पोमधून अनोळखी चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ८ डिव्हाईस बॅगा चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल शिवाजी ठोंगे (वय ३७, रा. हिंगणगाव बु, ता. परांडा, जि. धाराशीव) हे टेम्पो चालक आहेत. ते २९ मे रोजी छत्रपती संभाजीनगर रोड, जालना येथील गोदामातून ३ एचपीचे १० सोलर पंप आणि १० डिव्हाईस बॅगा घेऊन खांडवी (ता. बार्शी) येथील सुरेश रंगराव पाटील यांच्या घरी डिलीव्हरी देण्यासाठी निघाले होते.
रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी आपला टेम्पो हिंगणगाव येथील घरासमोर पार्क केला होता. दुस-या दिवशी म्हणजेच ३० मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते खांडवी येथे पोहचले. सुरेश पाटील यांच्या घरासमोर टेम्पोमधील साहित्य खाली करत असताना, राहुल ठोंगे यांना ८ डिव्हाईस बॅगा कमी असल्याचे आढळून आले. २९ मे सायंकाळी ४:४५ ते ३० मे सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान अनोळखी चोरट्याने टेम्पोमधून प्रत्येकी १५ ते २० किलो वजनाच्या ८ डिव्हाईस बॅगा (ज्यामध्ये ७० मीटर व ३० मीटरच्या केबल होत्या) चोरून नेल्या. चोरीला गेलेल्या या साहित्याची किंमत एक लाख २० हजार रुपये आहे.