सोलापूर – सोलापूर शहराच्या हद्दवाढीनंतर महापालिका क्षेत्रात आलेल्या जिल्हा परिषदेच्या खासगी शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने संबंधित मुख्याध्यापक, शिक्षण विभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असून, हस्तांतरणाची रूपरेषा निश्चित करण्याची तयारी सुरू झाली आहे.
हद्दवाढीनंतर अनेक शाळांच्या प्रशासकीय नियंत्रणाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे निधी, विकासकामे, शिक्षक-कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि शाळांच्या दैनंदिन कारभारावर परिणाम होत होता. आता ही प्रक्रिया मार्गी लागल्याने संबंधित शाळांना महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, या बैठकीत शाळांचे हस्तांतरण, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समायोजन, शाळांच्या इमारती व मालमत्तेची नोंद, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांचे सातत्य तसेच पुढील प्रशासकीय प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा होणार आहे. यासाठी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात आल्या आहेत. आता खासगी शाळांच्या हस्तांतरणालाही वेग दिला जात असल्याने प्रलंबित प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रक्रियेमुळे संबंधित शाळांना विकासनिधी उपलब्ध होण्याची शक्यता वाढणार असून, पायाभूत सुविधा, दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळू शकतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रशासकीय प्रश्नांवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कोट
खाजगी शाळा संबंधी आयुक्तांची बैठक
जिल्हा परिषदेच्या ३५ शाळांचे यु-डायस पुन्हा झेडपी कडे वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित खाजगी संस्था महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. यासंबंधी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी बैठक बोलावली आहे.
– कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि. प. सोलापूर