कुंभारी : येथील श्री. गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांना यावेळी अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सोलापूरच्या थोर हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश बसुदेपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतिदिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भाषणे केली. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाची पार्श्वभूमी, महात्मा गांधींचे नेतृत्व, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेला संघर्ष याबाबत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या भाषणातून देशभक्ती, स्वातंत्र्यसैनिकांविषयी कृतज्ञता आणि राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त झाली.
मुख्याध्यापक रमेश बसुदेपाटील यांनी मार्गदर्शन करताना, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग, धैर्य व देशभक्तीचे स्मरण करून त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असे आवाहन केले. “स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी केलेल्या त्यागाची जाणीव ठेवून ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना मनात बाळगावी. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून सामाजिक सलोखा राखत देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनील स्वामी यांनी केले. देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
Post Views: 5