चारठाणा/प्रतिनिधी
जिंतूर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चारठाणा गावाजवळील एका वळण रस्त्यावर क्रुझर जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन पलट्या खात रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात गेल्याने अपघात होऊन या जीपमधील दोन जण जागीच ठार झाले तर बारा जण गंभीर जखमी झाले. यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बुधवारी (दि.३) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला.
हिंगोली जिल्ह्यातील कनका या गावातील भाविक एम.एच.२२,यु ४३५२ या क्रमांकाच्या क्रूझर जीपने शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून गावी परतत असताना बुधवारी (दि.३) पहाटे साडेतीनच्या दरम्यान चारठाणा गावाजवळील एका वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने क्रुझर अनेक पलट्या खात रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जावून आदळली. जीपमधील रुक्मिनी चंदू चाभाडे (वय ३५ वर्ष) व दिपक सखाराम जाधव (वय ३६ वर्ष) हे जागीच ठार झाले.
तर इतर बारा भाविक जखमी झाले. अपघातानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे,पो.हे.काॅ.रामकिशन कोंडरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्ण वाहिकेतून जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. जिंतुर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून यातील तिन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.