
सांगोला – उत्कर्ष प्राथमिक विद्यालय, सांगोला येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. बालक मंदिरातील चिमुकल्यांचे बालगीतांच्या सुरेल तालावर, कुंकुमतिलक व औक्षण करून आनंदमय वातावरणात स्वागत करण्यात आले. रंगबिरंगी रांगोळ्या, पताका ,फुले व फुग्यांनी सजवलेल्या परिसरामुळे आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. आकर्षक सजवलेल्या बैलगाडीची रम्य सफर हा प्रवेशोत्सवाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला. सरस्वती पूजन व प्रार्थनेने कार्यक्रमास मंगलमय सुरुवात झाली. संस्थाध्यक्षा दमयंती कुलकर्णी, कोषाध्यक्षा शालिनी कुलकर्णी, मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी तसेच शालेय शिक्षण समितीच्या सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी टकले यांनी विद्यालयास सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रेरणादायी व मूल्याधिष्ठित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉईंटवर विद्यार्थी व पालकांनी आनंदाने छायाचित्रे टिपली. अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर रोपे विद्यालयाला भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यालयाचे प्राचार्य सुनिल कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रशांत भोसले, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विश्रांती मागाडे, उपमुख्याध्यापिका स्वराली कुलकर्णी, पूर्व प्राथमिकच्या माजी मुख्याध्यापिका सुनिता कुलकर्णी, पर्यवेक्षिका शालन गयाळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेशोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.
Post Views: 31