सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील उपायुक्त (कर निर्धारक व संकलन अधिकारी ) यांची आशिष लोकरे यांची
प्रशासकीय कारणास्तव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सहआयुक्त गट-अ पदावर बदली करण्यात आली आहे.
शासनाने सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने ही बदली करत लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त पदावर प्रशासकीय कारणास्तव नियुक्ती केली आहे. सध्या ते सोलापूर महानगरपालिकेत उपायुक्त (कर ) म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या आदेशानुसार उपायुक्त लोकरे यांना १७ जून २०२६ रोजी त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येणार असून, १८ जून रोजी नव्या पदावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रुजू झाल्यानंतर त्याचा अनुपालन अहवाल तात्काळ शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा आदेश जारी करण्यात आला असून, शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
आशिष लोकरे हे दिनांक 25 जुलै 2023 रोजी सोलापूर महापालिकेत उपायुक्त म्हणून रुजू झाले. त्यांच्याकडे महापालिकेतील कर विभागाचा पदभार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी कर विभाग अत्यंत सुसूत्र पद्धतीने सांभाळाला. त्यांच्या या कार्यकाळामध्ये महापालिकेत दोन वेळा 100 टक्के शास्ती माफीचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे कर विभागांतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली इष्टांक पूर्ण करून त्याहीपेक्षा जास्तची कर वसुली करण्यात या विभागाला यश मिळाले. 31 मार्च 2025 रोजी एकाच दिवशी 12 कोटी रुपये रेकॉर्ड ब्रेक कर वसुली झाली होती. या विभागात नियोजनबद्ध काम केल्याने कोट्यावधी रुपयाची कर वसुली झाली आहे. 31 डिसेंबर पर्यंत तब्बल 112 कोटी रुपये कर वसुली करून नवा विक्रम केला आहे.
विशेष म्हणजे भूमी मालमत्ता विभागाचे संगणकीकरण करण्यात आले. त्याचबरोबर सद्यस्थितीत नवीन झोन कार्यालयाची रचनाही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पार पडली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सोलापूर महापालिकेत प्रथमच त्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झाला होता. एक लोकाभिमुख अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला आहे. आरोग्य विभागामध्ये भरती प्रक्रिया तसेच नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केले. सोलापूर शहरातील मोठ्या पावसानंतर नाला खोलीकरणाचे कामही त्यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले. बहुचर्चित पानाश टॉवर प्रकरणी चौकशीही त्यांनी केली होती. याप्रकरणी महापालिकेतील तब्बल 12 अधिकाऱ्यांना नोटीसही बजावणत आल्या होत्या. अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील मोठ्या प्रमाणात लागलेले आगीच्या घटनेनंतर येथील सर्वेक्षण करून 954 विविध मिळकतींची सुसूत्रता त्यांनी केली. त्याचबरोबर येथील आपत्ती व्यवस्थापन आणि आग नियंत्रण आदी घटनांची कायदेशीर जबाबदारी ही एमआयडीसी कडेच असते याच्या नियमानुसार जबाबदारी निश्चित केली. सामान्य प्रशासन विभाग सांभाळत असताना लाड कमिटी आणि अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया ही नेटक्या पद्धतीने राबवली. यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ मिळाला. सरळ सेवा भरती राबविण्यात आली होती.
Post Views: 19