अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यातील ऐतिहासिक, हेमांडपंती आणि दक्षिणमुखी जागृत देवस्थान असलेल्या गौडगाव (बु.) येथील श्री जागृत मारुती मंदिरात येत्या शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) रोजी अथांग भक्तीचा महापूर येणार आहे. निमित्त आहे, वर्षातून एकदाच अत्यंत भाग्याने येणाऱ्या पवित्र ‘शनि अमावस्या’ पर्वणीचे! या एका दिवसासाठी जणू संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची पावले जागृत मारुतीच्या मंदिराकडे वळत आहेत.
शनिवारी पहाटे ५ वाजता गौडगावचे मारुती मंदिरात वैदिक मंत्रोच्चार, हवनाचा सुवास आणि भक्तांच्या हुंदक्यामिश्रित हाकेने दुमदुमून जाणार आहे. या पवित्र मुहूर्तावर होणारा रुद्राभिषेक, होमहवन आणि महाआरती म्हणजे जणू ईश्वराशी माणसाचे थेट साक्षात जुळणारे नाते ठरणार आहे. अनेक भक्तगण तर शहरांची दगदग विसरून, आदल्या रात्रीच मंदिरात मुक्कामी येऊन बसणार आहेत, तर कित्येकजण पहाटेच्या गारठ्यात रांगेत उभे राहून फक्त एकदा त्या जागृत मूर्तीचे डोळे भरून दर्शन घेण्यासाठी आतुर झाले आहेत.”११ शनिवार किंवा मंगळवार मारुतीचे दर्शन घेतल्याने मनातील प्रत्येक सल आणि इच्छा पूर्ण होते,” हा केवळ नियम नाही, तर पिढ्यानपिढ्या जपत आलेला विश्वासाचा धागा आहे.
या भक्तीला केवळ धार्मिकतेची नव्हे,तर माणुसकीच्या सुंदर स्पर्शाची जोड लाभली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सचिव व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली यंदा या मंगल प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.”दुसऱ्याच्या वहाणाऱ्या रक्ताला जीवन देणे, हीच मारुतीरायाची खरी भक्ती आहे,हा संदेश यातून दिला जात आहे. तसेच, दूरदूरवरून चालत किंवा वाहनाने आलेल्या प्रत्येक थकलेल्या भक्तासाठी मंदिर समितीने महाप्रसादाची सोय केली आहे. अन्नदानाची ही सेवा म्हणजे जणू मारुतीरायाने आपल्या सर्व लेकरांना आपल्या पंखाखाली घेत प्रेमाने भरवल्याचा भास निर्माण करणारी ठरणार आहे.
शनिवारी ही शनि अमावस्या जेव्हा माथ्यावर येईल, तेव्हा प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात एक अनामिक अश्रू आणि ओठांवर कृतज्ञतेचे हास्य असेल. कारण येथे येणारा माणूस कधीही रिकाम्या हाताने किंवा दुःखी परत जात नाही, हीच या जागृत देवस्थानाची प्रचिती आहे.तरी या पावन आणि भावनिक सोहळ्यात, मारुतीरायाच्या चरणी लीन होऊन आत्मिक शांततेचा अनुभव घेण्यासाठी सर्व भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने अत्यंत आर्ततेने करण्यात येत आहे.
Post Views: 15