सोलापूर : महानायक पद्मविभूषण डॉ. अमिताभ बच्चन यांच्या ८४व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील सुपरहिट गीतांचा कराओके कार्यक्रम रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात उत्साहात पार पडला. पद्मविभूषण महानायक डॉ. अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेचे विजय इप्पाकायल आणि ‘सा रे गा मा पा’चे अशरफ खान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. डॉ. नसीमा पठाण, पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त मधुकर कट्टा, चित्तरंजन शहा आणि आशुतोष नाटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील सुमारे २० ते २२ गीते अमिताभप्रेमी कलाकारांनी कराओकेच्या माध्यमातून आपल्या बहारदार आवाजात सादर केली.
यावेळी काही कलाकारांनी अमिताभ बच्चन यांचे गाजलेले संवादही सादर केले. गीतांना आणि संवादांना रसिकांनी टाळ्या व शिट्ट्यांच्या कडकडाटात दाद दिल्याने हुतात्मा स्मृती मंदिराचा परिसर अक्षरशः दणाणून गेला. अमिताभ यांच्या अभिनयाची, आवाजाची आणि संवादफेकीची आठवण या कार्यक्रमातून चाहत्यांनी पुन्हा अनुभवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक विवेक कन्ना यांनी केले. यावेळी लक्ष्मण विडप, दत्तू पोसा, श्रीनिवास गंधमल, अनिल बुराडे, श्रीनिवास बटगिरी, बालाजी बुगडे, केशव गणपा, चंदू मुलींटी, अंजन सज्जन, किशोर म्हेत्रे, रमेश सुंचू, संजय भुतडा, राज मणियार, राजकुमार गटी, रमेश शेट्टी, दत्तात्रय खैरमुडे, गणेश सातालोलू, मारुती म्हेत्रे आणि अमरीश कुंटला यांच्यासह बहुसंख्य अमिताभप्रेमी, चाहते, नागरिक, माता-भगिनी आणि बंधू उपस्थित होते.
—
Post Views: 16