पुण्यात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ससून सर्वोपचार रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर अखेर त्यांची वर्णी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी लावण्यात आली आहे. डॉ. ठाकूर हे सोलापुरात यापूर्वी चार वर्षे अधिष्ठातापदावर कार्यरत असताना काही प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरले होते.
ससून रूग्णालय अर्थात बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असताना रूग्णालयात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपींना साह्य केल्याचे प्रकरण उजेडात आले होते. त्यात डॉ. ठाकूर हे अडचणीत आले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती.
या पार्श्वभूमीवर त्यांना शासनाच्या १० नोव्हेंबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार त्यांच्याकडून अधिष्ठातापदाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. तर इकडे सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे गेल्या १३ फेब्रुवारी रोजी अधिष्ठातापदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला होता. तथापि, डॉ. संजीव ठाकूर हे आपला पुण्यातील पदभार काढून घेतल्याच्या विरोधात मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॕट) धाव घेतली होती.
त्यावर निकाल प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणापुढील मूळ अर्जावर होणा-या आदेशाला आधीन राहून डॉ. ठाकूर यांची सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदी पाठविण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने जारी केला आहे.