करमाळा – पैसा व काम मिळावे या कारणासाठी संपर्कात आलेल्या एका भाविक महिलेला पाचवी वारी करण्याच्या नावाखाली आश्रमात बोलावून मंत्रोपचार करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू बाबा मनोहर मामा भोसले यावर करमाळा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी महिलेने जानेवारी 2025 मध्ये घरात पैसे यावेत काम मिळावे म्हणून मैत्रिणीच्या सांगण्यावरून वडाचीवाडी पुणे येथे मनोहर मामा भोसले यास भेटून त्याच्या सांगण्यावरून वडाचीवाडी येथील आश्रमातील चार वाऱ्या केल्या होत्या. त्यानंतर आश्रमातील नाथबाबा यांनी पुढील पाचवी वारी करण्यासाठी घोटी (तालुका करमाळा )येथे येण्यास सांगितले व त्या ठिकाणी मोठी पुजा करायाची आहे असे सांगितले होते. त्यानंतर नाथबाबा याने चालकासह फिर्यादीचे घरी जावून चारचाकी वाहनातून तिला घोटी येथील आश्रमात आणून राहण्यासाठी आश्रमातील खोली दिली व तिचेकडून 11,000/- रूपये घेतले. दरम्यान पहाटे आरोपी मनोहर भोसले हा फिर्यादीच्या खोलीत येवून पुजेकरीता तीला कपडे काढण्यास सांगितले. त्यास फिर्यादीने नकार दिला असता जबरदस्तीने कपडे काढून , मंत्रोपचार करून फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला .याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात आरोपी भोंदू बाबा मनोहर भोसले याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक, आर्थिक शोषण, धमकी व महिलेस मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट –
सदर प्रकारामुळे नागरिकांनी अंधश्रद्धा, धार्मिक भीती अथवा कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. कोणतीही व्यक्ती धार्मिक विधीए जादूटोणा, अडचणी दूर करण्याचे आमिष किंवा भीती दाखवून आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
Post Views: 5