टेंभुर्णी – येथील टेंभुर्णी-बेंबळे रोड परिसरात सोमवारी (दि.२५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गॅस लिकेजमुळे भीषण आग लागून झालेल्या स्फोटात पिता-पुत्रीसह चौघेजण भाजून जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
या दुर्घटनेत दयानंद कावरे (वय ४०), पत्नी शितल दयानंद कावरे (वय ३६), मुलगी कुमारी गौतमी दयानंद कावरे (वय १३) तसेच विलास मच्छिंद्र सातव (वय ४२, सर्व रा. टेंभुर्णी ता. माढा) हे चौघेजण जखमी झाले आहेत. यापैकी दयानंद कावरे व त्यांची मुलगी गौतमी हे गंभीररीत्या भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दयानंद कावरे यांच्या घरात कुटुंबीयांसह विलास सातव बसले होते. संध्याकाळची वेळ झाल्याने चहा करण्यासाठी दुधाची पिशवी आणण्यास मुलाला पाठविण्यात आले होते. मुलाने दुधाची पिशवी आणून दिल्यानंतर तो बाहेर खेळण्यासाठी गेला. त्यानंतर कुमारी गौतमी हिने घरात जाऊन चहा करण्यासाठी गॅस सुरू केला. मात्र गॅस सिलिंडर किंवा गॅस जोडणीमधून लिकेज होत असल्याने अचानक मोठा भडका उडाला.
क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील तिघांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. आगीची तीव्रता एवढी होती की घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या तसेच दरवाजा चौकटीसह सुमारे वीस ते पंचवीस फूट अंतरावर जाऊन पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चादरी व गोदड्यांच्या साहाय्याने जखमींच्या अंगावरील आग विझवली.
घटनेत जखमी झालेल्यांच्या अंगावरील कपडे पूर्णपणे जळून शरीराला चिकटल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींना तातडीने उपचारासाठी टेंभुर्णीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दयानंद कावरे व गौतमी कावरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दीक केली होती. रात्री उशिरापर्यंत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते असून पुढील तपास सुरू आहे.
Post Views: 5