सोलापूर : जागतिक बँक समूहाच्या जमीन विषयक तज्ज्ञांचे शिष्टमंडळ ५ आणि ६ ऑक्टोबर या दोन दिवसांच्या भेटीसाठी सोलापूर महानगरपालिकेत दाखल झाले आहे. पहिल्या दिवशी सोमवारी पथकाने महापालिकेच्या विविध विभागांकडून जमीन व्यवस्थापन, मालमत्ता नोंदी, नगररचना आणि डिजिटल प्रणालींसंदर्भातील माहिती घेतली. महापालिकेच्या कामकाजाचा अभ्यास करून त्यातील चांगल्या पद्धती, उणिवा आणि आवश्यक सुधारणांचा आढावा घेणे हा या भेटीचा उद्देश आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.
महाराष्ट्र अर्बन वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अँड रियूज प्रोग्रामअंतर्गत हे जागतिक बँकेचे शिष्टमंडळ सोलापुरात आले आहे. या पथकामध्ये जागतिक बँकेचे जमीन विषयक जागतिक प्रमुख मिका तोहोंनेन, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान तज्ज्ञ अलेक्झांडर सोलोव्होव्ह तसेच पाणीपुरवठा व संस्थात्मक व्यवस्थापन तज्ज्ञ जे. व्ही. आर. मूर्ती यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मालमत्ता नोंदणी व मूल्यांकन, प्रादेशिक नियोजन, बांधकाम परवानग्या, महापालिकेच्या मालकीच्या जमिनींच्या नोंदी तसेच जमीन व मालमत्ता उत्पन्नीकरणासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती घेण्यात आली. या बैठकीस उपायुक्त सोनाली यादव, विद्युत विभागाचे अभियंता राजेश परदेशी, मुख्य लेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर, संगणक विभाग प्रमुख नागनाथ पदमगोंडे, उपअभियंता अविनाश वाघमारे, उपअभियंता ऊसतुर्गीकर, संगणक विभागाचे मतीन सय्यद यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी महापालिकेच्या विविध विभागांतील डिजिटल व ऑनलाइन प्रणाली, भू-स्थानिक माहिती प्रणाली अर्थात जीआयएस, मालमत्ता कर पोर्टल, जमीन व इमारतींच्या नोंदी यांची माहिती घेण्यात आली. तसेच पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्था, मालमत्ता कराचे मूल्यांकन व वसुली, मालमत्तांच्या नोंदी आणि विविध विभागांमधील माहितीची परस्पर सांगड याबाबतही चर्चा झाली.
मालमत्ता कराचा आधार वाढविण्यासाठी जीआयएसचा वापर, जमीन नोंदींचे डिजिटलायझेशन, महापालिकेच्या मालमत्तांचे मॅपिंग आणि उत्पन्नीकरणाच्या शक्यता यांचाही अभ्यास करण्यात येत आहे. मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजीही पथकाकडून विविध विभागांची माहिती घेण्यात येणार आहे.
दोन दिवसांच्या या पाहणीनंतर पथकाकडून सोलापूर महापालिकेच्या जमीन व्यवस्थापन व नागरी सेवा प्रणालींचा सविस्तर अभ्यास करून भविष्यातील सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात येणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितले.
आढाव्याचे प्रमुख विषय असे –
सोलापूर महानगरपालिकेच्या विकास आराखड्याची सद्यस्थिती, नगररचना, बांधकाम परवाने, जीआयएस प्रणाली, जमीन व मालमत्ता नोंदी, मालमत्ता कर आकारणी व वसुली, पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्था, झोपडपट्टी व्यवस्थापन, डिजिटल प्रणालींची परस्पर जोडणी, मालकी हस्तांतरण प्रक्रिया, महापालिकेच्या मालकीच्या जमिनी व इमारतींचे व्यवस्थापन, मालमत्ता मूल्यांकन, जमीन व मालमत्ता उत्पन्नीकरणाच्या शक्यता तसेच महसूलवाढ, प्रशासकीय पारदर्शकता आणि नागरी सेवांच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा हे शिष्टमंडळ घेणार आहे.
————
Post Views: 10