सोलापूर : कॉ. गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, मीनाक्षीताई साने फिडरवरील वारंवार होणारे लाईन फॉल्ट, देखभालीचा अभाव तसेच चार-पाच महिन्यांपासून नागरिकांना वीजबिले न मिळण्याच्या प्रश्नावर (DYFI) भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने गुरुवारी महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कॉ.बापू साबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाच्या सुरुवातीला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी महावितरण कार्यालयात प्रवेश करून नागरिकांच्या वीज समस्यांबाबत प्रशासनाचा निषेध केला.
यावेळी मीनाक्षीताई साने फिडरवरील तांत्रिक बिघाड कायमस्वरूपी दूर करावा, नियमित प्रतिबंधात्मक देखभाल करावी, वीजबिले वेळेवर मिळावीत तसेच वीजबिलांचे गट्टे जाळल्याच्या कथित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनाची दखल घेत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी कॉ. गोदूताई परुळेकर नगरातील नागरिकांच्या विद्युत समस्यांबाबत तसेच युवा महासंघाच्या मागण्यांवर विशेष बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाने सदर आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
यावेळी युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांनी, “लेखी आश्वासनाची प्रभावी अंमलबजावणी करून १५ दिवसांच्या आत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष सोडवाव्यात. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा दिला. दरम्यान, केवळ बैठक घेऊन प्रश्न प्रलंबित ठेवण्याऐवजी प्रत्यक्ष विद्युत यंत्रणेची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी शिष्टमंडळात युवा महासंघाचे राज्य समिती सदस्य विजय हरसुरे व दिनेश बडगु, चंटी बिटला, अमित मंचले, विजय साबळे, एजाज खलिफा आदींची उपस्थिती होती.
























