पंढरपूर – श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘बाल वारकरी आषाढी वारी दिंडी सोहळा’ अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी पारंपरिक वारकरी पोशाखात नटलेल्या विद्यार्थ्यांनी ‘जय हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय करून सोडला. विद्यार्थ्यांनी हातात टाळ-मृदंग घेऊन आणि सामाजिक संदेश देणारे विविध प्रबोधनात्मक फलक हाती धरून साक्षरता व सामाजिक जनजागृतीचा संदेश दिला. या दिंडी सोहळ्याचा शुभारंभ श्री. व सौ. धोकटे आणि श्री. व सौ. कांबळे या पालकांच्या हस्ते पालखीचे पूजन करून करण्यात आला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण भव्य ‘रिंगण सोहळा’ ठरले. दिंडीची सांगता रिंगण सोहळ्याने झाली. या प्रसंगी विद्यार्थिनींनी फुगडी, काठवट यांसारखे पारंपरिक लोकखेळ सादर करत हरिनामाचा गजर केला. विद्यार्थ्यांच्या या विलोभनीय आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.
या पारंपारिक दिंडी आणि रिंगण सोहळ्याचे औचित्य साधून प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई म्हणाल्या, “शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या धार्मिक व सांस्कृतिक उत्सवाची परंपरा कर्मयोगी विद्यानिकेतनने आजही जपून ठेवली आहे. कर्मयोगीमध्ये साजरा होणारा वारीचा हा उत्सव अद्भुत असतो. यामुळे शाळेत अत्यंत भक्तिमय वातावरण तयार होते आणि विद्यार्थ्यांवर नकळत उत्तम संस्कार घडतात.”
या प्रसंगी श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच विविध क्षेत्रांतील पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 4