सोलापूर – महाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) प्रवेशोत्तर परीक्षा–२०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, सोलापूरतर्फे आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय विषयवार प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न झाले. पदोन्नतीस पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभ्यासक्रमातील विविध कायदे, नियम आणि प्रशासकीय कामकाजाचे सखोल ज्ञान मिळावे, याउद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, शिस्त व अपील नियम, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, अभिलेख व्यवस्थापन, जिल्हा परिषद प्रवेश नियम, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, माहितीचा अधिकार अधिनियम, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, अंदाजपत्रक, निधी पुनर्विनियोजन, आकस्मिक खर्च नियम तसेच शासन निर्णय व परिपत्रकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले असून ॲड. राजेश देशपांडे, अविनाश गोडसे, प्रदीप सगट, अजितकुमार देशपांडे, राजेंद्र बारगड, हरीष मेत्रस, आनंद जाधव, अरुण वाघमोडे आणि शिवराज राठोड यांनी विषयतज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी परीक्षेतील महत्त्वाचे मुद्दे, प्रशासकीय कामकाजातील बारकावे, कायद्यांची अंमलबजावणी आणि कार्यालयीन कार्यपद्धती याबाबत सखोल माहिती देत सहभागींच्या शंकांचे निरसन केले.
या प्रशिक्षणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा परीक्षेचा आत्मविश्वास वाढला असून पदोन्नती परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली अभ्यासाची दिशा स्पष्ट झाली. जिल्हा परिषदेच्या सक्षम आणि गुणवत्तापूर्ण प्रशासकीय यंत्रणेसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या उपक्रमाला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Post Views: 6