सोलापूर : बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी असलेला पॉक्सो कायदा, अमली पदार्थांच्या सेवनाचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम तसेच रॅगिंगचे सामाजिक आणि कायदेशीर परिणाम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती घेण्याबरोबरच कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला बळी न पडता त्याविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर आणि सिंहगड इन्स्टिट्यूट्स यांच्या संयुक्त विद्यमाने एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अॅड. श्रेया सापटनेकर यांनी पॉक्सो कायद्याच्या विविध तरतुदी, बालकांच्या संरक्षणाचे महत्त्व, लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण आणि अशा घटनांची तक्रार करण्याची प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सारथी यूथ फाउंडेशनचे संस्थापक सचिव रामचंद्र वाघमारे यांनी ‘ड्रग अवेअरनेस अँड वेलनेस नेव्हिगेशन’ या उपक्रमांतर्गत अमली पदार्थांचे व्यसन, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणारे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध मार्ग याबाबत माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार ए. देशपांडे यांनी रॅगिंगविरोधी कायद्याची माहिती देताना रॅगिंग ही केवळ महाविद्यालयीन शिस्तभंगाची बाब नसून त्याचे गंभीर सामाजिक व कायदेशीर परिणाम होऊ शकतात, असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी रॅगिंगला प्रोत्साहन न देता पीडित विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे आणि कोणतीही घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंहगड इन्स्टिट्यूट्सचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी न्यायाधीश अमोलकुमार ए. देशपांडे यांच्या हस्ते कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
रॅगिंगविरोधी जनजागृतीचा संदेश सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. कायदेविषयक जनजागृतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारांसोबतच सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास अॅड. बसवराज सलगर, अॅड. सुजय एस. सापटनेकर, अॅड. श्रेया सापटनेकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कायदेशीर व व्यावहारिक दृष्टिकोनातून उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले, तर प्रियांका गायकवाड यांनी आभार मानले.
Post Views: 14