सोलापूर – शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांनी महत्त्वाचा आदेश जारी करत माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) शाखेच्या अतिरिक्त कार्यभारात बदल केला आहे. या आदेशानुसार प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी शाखेचे अधीक्षक भरत कारसले यांच्याकडे माध्यमिक शाखेचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
यापूर्वी ही जबाबदारी उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला असून आता ही जबाबदारी भरत कारसले यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत राहणार आहे.
अधीक्षक लक्ष्मण बालवाड यांना २८ जून रोजी अटक झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांच्या वेतन, भविष्य निर्वाह निधी तसेच संबंधित आर्थिक प्रशासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी विभागीय स्तरावर तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
भरत कारसले यांनी आपल्या मूळ पदाचा कार्यभार सांभाळत नव्या जबाबदारीचा स्वीकार करून त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे वेतन प्रकरणे, जीपीएफ प्रस्ताव, निवृत्तीविषयक कागदपत्रे आणि प्रलंबित प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शिक्षण विभागातील आर्थिक व्यवहार सुरळीत राहावेत आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांची गैरसोय टळावी, या उद्देशाने हा प्रशासकीय फेरबदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
Post Views: 16